
यावल :(प्रतिनिधी ) तालुक्यातील विरावली येथील रहिवासी आणि हल्ली मुक्काम किनगाव असलेले एस. बी. पाटील सर व सुजाता पाटील मॅडम यांचे चिरंजीव समीर पाटील यांनी जर्मनीतील IU International University of Applied Sciences येथून संगणकशास्त्रातील मास्टर्स पदवी पूर्ण करताना उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरी केली आहे. त्यांच्या मास्टर्स प्रबंधासाठी १०० पैकी तब्बल ९८.४ गुण मिळवत त्यांनी १.० ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘Best Thesis Award’ प्रदान करून पदवीदान समारंभात गौरविण्यात आले.
समीर पाटील यांच्या मास्टर्स प्रबंधाचा विषय “Design and Implementation of an End-to-End Automation Pipeline for Semiconductors in the Area of Product Management” असा होता. हा प्रकल्प त्यांनी जर्मनीतील आघाडीची कंपनी Bosch यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष औद्योगिक समस्येवर आधारित विकसित केला.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील विविध स्रोतांमध्ये विखुरलेल्या उत्पादन नियोजनाच्या डेटाचे सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम पद्धतीने व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी समीर यांनी एंड-टू-एंड ऑटोमेशन पाइपलाइन विकसित केली. या प्रकल्पामुळे उत्पादन नियोजनातील प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक आणि कार्यक्षम होण्यास मदत झाली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे प्रक्रियेतील मॅन्युअल कामाचा सुमारे ६७ टक्के भार कमी झाला. त्याचबरोबर डेटा गुणवत्तेत सुधारणा झाली आणि विविध स्रोतांमधील माहिती एका केंद्रीकृत व विश्वासार्ह डेटास्रोतामध्ये उपलब्ध झाली. परिणामी अधिक जलद व डेटा-आधारित निर्णय घेणे शक्य झाले तसेच Bosch साठी लक्षणीय वार्षिक खर्च बचतीची संधी निर्माण झाली.
समीर यांच्या प्रबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ शैक्षणिक किंवा प्रायोगिक स्वरूपाचा न राहता प्रत्यक्ष औद्योगिक समस्येवर परिणामकारक उपाय देणारा ठरला. सेमीकंडक्टर उत्पादन व्यवस्थापनातील वास्तविक समस्या ओळखून उद्योगाच्या गरजांना अनुरूप कार्यक्षम तंत्रज्ञानाधारित उपाय त्यांनी विकसित केला.
१०० पैकी ९८.४ गुण आणि १.० ही सर्वोच्च श्रेणी मिळविण्यासोबतच Best Thesis Award मिळाल्याने त्यांच्या संशोधनकार्याला आणि औद्योगिक प्रकल्पाला विशेष मान्यता मिळाली आहे. AI आणि Data क्षेत्रात प्रत्यक्ष उद्योगसमस्या सोडविण्याच्या दिशेने त्यांनी केलेली ही कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेचे आणि कौशल्याचे दर्शन घडविणारी आहे.
तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
समीर पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यावल नगराध्यक्ष छाया अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अजय पाटील सर, अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत आबा पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, इंग्लिश स्कूलचे चेअरमन विजय पाटील, माजी सरपंच संजय पाटील, विजय पाटील, साकळी गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, रवींद्र पाटील, आर. जी. पाटील यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी समीर पाटील यांचे कौतुक करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर यांच्या या यशामुळे विरावली, किनगाव तसेच संपूर्ण यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जर्मनीत उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि जागतिक स्तरावर आपल्या ज्ञान-कौशल्याचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.

