
तडवी भिल उत्सव समितीचा उपक्रम लक्षवेधी; सुमाई मंगल कार्यालयात जनसागर, संस्कृतीचे भव्य दर्शन
यावल( प्रतिनिधी ) जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल येथील सुमाई मंगल कार्यालयात आदिवासी तडवी भिल उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तडवी भिल समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही सभागृह प्रेक्षकांनी खच्चाखच भरले होते.
भव्य व्यासपीठ, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा, भिलोरी गीते, विविध देखावे आणि आखाडा खेळाच्या प्रात्यक्षिकातून तडवी भिल समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. आदिवासी जननायक टंट्यामामा भिल यांच्या वंशजांची उपस्थिती तसेच सुनिल सिरसाठे यांचे भिलोरी भाषेतील भाषण विशेष आकर्षण ठरले.
लहान अर्श नवाज तडवी याने शिक्षण, आरोग्य व बेरोजगारी या विषयांवर भिलोरी भाषेत केलेले भाषण उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आभोडा येथील गवईकर कुळातील महिलांनी सादर केलेला पारंपरिक व ऐतिहासिक ‘पेटारा’ हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.
रावेर-यावलचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी आदिवासी तडवी भिल रॅलीत सहभाग घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजयभाऊ चौधरी, संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, नाशिकच्या नगरसेविका आशाताई तडवी सरपंच मीना तडवी, बालप्रकल्प अधिकारी रफिक तडवी,यांच्या परिवारासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावलसह जळगाव, भुसावळ, पुणे, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी येथूनही समाजबांधव उपस्थित झाले. महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती, चिमुकल्या मुलींचे आदिवासी तालावरील नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या यशासाठी उत्सव समितीच्या सदस्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत नियोजन केले. समाजबांधवांच्या सहकार्याने निधी उभारून पाणी, भोजन, व्यासपीठ, बॅनर, ढोल-ताशे, टी-शर्ट, बिल्ले व प्रमाणपत्रांची व्यवस्था करण्यात आली.
‘मीपणा’ बाजूला ठेवून एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे आदिवासी गौरव दिनाचा हा उपक्रम यशस्वी ठरला. तडवी भिल समाजाची एकता, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडविणारा हा कार्यक्रम यावलच्या इतिहासात लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाच्या यशाबद्दल आदिवासी तडवी भिल उत्सव समितीच्या संपूर्ण टीमचे समाजबांधवांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

