यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव येथील कन्या कु. दिशा विजय पाटील हिची भारताच्या गौरवशाली सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये क्रीडा कोटा अंतर्गत (Sports Quota) झालेल्या निवडमुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, गावाची शान तालुक्याचा अभिमान असे गावकऱ्यांमधून बोलले जात आहे, तिला दिल्ली येथे येत्या सोमवारी रुजू होण्याचे पत्र देण्यात आले आहे.
आपल्या कठोर परिश्रमाने, आत्मविश्वासाने आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर Boxing (57-60 Kg Female) या प्रकारातून तिने ही यशस्वी झेप घेतली आहे.
गावाच्या मातीतील संस्कार, आई-वडिलांचे आशीर्वाद, स्वतःची मेहनत आणि जिंकण्याची जिद्द यांचा सुंदर संगम म्हणजे दिशा पाटील यांचे हे यश आहे.तिला बॉक्सिंगमध्ये करियर करण्यासाठी तिच्या आई आणि वडिलांनी जी मेहनत घेतली . तिला नेहमी पाठिंबा दिला त्याचे हे फलित आहे ..त्यांच्या या सर्व परिश्रमाचे तालुक्यात स्वागत केले जात आहे.
एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंत पोहोचला आहे. ही गोष्ट प्रत्येक तरुण-तरुणीसाठी प्रेरणादायी आहे की, परिस्थिती कोणतीही असो… मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालता येते.
“खेळाच्या मैदानातून देशसेवेच्या रणांगणापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अभिमानास्पद आहे.”

दिशा पाटील हिच्या या उल्लेखनीय यशामुळे खान्देशच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

