
धानोरा, ता. चोपडा
यावल प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हेगारी उघडकीस आणली आहे. सायबर गुन्हेगारांनी आता शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. धानोरा येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत तब्बल 1 लाख 96 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
धानोरा येथील शेतकरी दीपक रोहिदास साळुंखे (वय 35) यांच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने दि. 7 ऑगस्ट रोजी 98 हजार रुपये, तर त्यानंतर दि. 8 ऑगस्ट रोजी पुन्हा 98 हजार रुपये, अशा दोन व्यवहारांत एकूण 1 लाख 96 हजार रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातून मोठी रक्कम परस्पर वडवली झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर साळुंखे यांनी तत्काळ याबाबतची माहिती घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने साळुंखे यांच्या खात्यातील रक्कम हडपल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. सलग दोन दिवस प्रत्येकी 98 हजार रुपयांचे व्यवहार झाल्याने या प्रकारामागे नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणी साळुंखे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे पथक तपास करीत आहे. संशयिताने कोणत्या माध्यमातून खात्यात प्रवेश मिळविला, व्यवहार कोणत्या खात्यात किंवा माध्यमातून करण्यात आले आणि या फसवणुकीमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्यात येत आहे.
ग्रामीण भागही सायबर भामट्यांच्या रडारवर
मोबाईल, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि विविध ऑनलाईन सेवांचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रकार ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहेत. पूर्वी सायबर फसवणुकीचे प्रकार प्रामुख्याने शहरांमध्ये घडत असल्याचे चित्र होते; मात्र आता गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य खातेदारांनाही सायबर भामटे लक्ष्य करीत आहेत. या घटनेने ग्रामीण भागातील बँक खातेदारांनी ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तीने फोन करून ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, यूपीआय पिन अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यास ती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
[
| 🎣 | !
______/
|_|

