

यावल( प्रतिनिधी)तालुकास्तरीय इयत्ता 3 री व 4 थी नवीन शालेय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम शिक्षक प्रशिक्षणास जळगाव जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी भेट दिली व सर्व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी सुद्धा उपस्थिती देऊन मार्गदर्शन केले तर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी पाटील यांनी नविन अभ्यासक्रमाचे विविध भाग, मुद्दे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यावेत.विविध विषयांमध्ये समवाय साधून अध्यापन करावे याविषयी माहिती दिली.निपुण भारत कार्यक्रमांतर्गत तालुका व जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी सर्व शिक्षकांनी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सर्वांनी उत्तमोत्तम प्रयत्न करावेत, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, दररोज निपुण तासिका घ्याव्यात, दर शनिवारी निपुण चाचणी घ्यावी या व इतर प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी देखील निपुण अभियान कार्यक्रमात यावल तालुका सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सर्व सुलभक, प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

