
यावल ( प्रतिनिधी)पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि जनसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साकळी (ता. यावल, जि. जळगाव) येथील ज्येष्ठ पत्रकार मिलिंद साहेबराव जंजाळे यांची संकल्प बहुउद्देशीय संस्था, अकोला यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे स्वागत केले जात आहे.
या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण शेगाव येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याच ठिकाणी पत्रकार मिलिंद साहेबराव जंजाळे यांचा सन्मान होणार आहे. ते सध्या एका दैनिकात उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत
आपल्या धडाकेबाज, निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेमुळे त्यांनी राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटली असून विविध विभागांना कार्यवाही करावी लागली आहे.
पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. आरोग्यविषयक जनजागृती, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आरोग्यदूत म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष कौतुकास्पद मानले जाते.
कोरोना महामारीच्या भीषण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आरोग्य विभागासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार, रुग्णवाहिका, औषधे, रक्त, बेड आणि इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देत अनेकांचे प्राण वाचविण्यास त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत ग्रामपंचायत, आरोग्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या निस्वार्थ सेवाभाव, सामाजिक जाणीव, लोकहिताची पत्रकारिता आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत संकल्प बहुउद्देशीय संस्था, अकोला यांनी त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित, प्रामाणिक आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव मानला जात आहे.
या पुरस्कारामुळे केवळ मिलिंद जंजाळे यांचाच नव्हे, तर साकळी गाव, यावल तालुका आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचाही सन्मान उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यासाठीही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“समाजासाठी लेखणी आणि सेवेसाठी आयुष्य” हे ब्रीद जपत कार्य करणाऱ्या पत्रकार मिलिंद जंजाळे यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

