
यावल (प्रतिनिधी)तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी शुक्रवारी यावल येथे धडक पाहणी केली. पंचायत समिती सभागृहात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे आणि विभागनिहाय त्रुटींचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीत अनेक विभागांच्या कामकाजावर चर्चा झाली. विशेषतः जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांच्या तुटवड्याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयुक्तांनी यासंदर्भात तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक आदेश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून प्रशासन अधिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी बजावले.
याच दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, न्हावी (प्र. यावल) येथेही भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, मूलभूत सुविधा तसेच शासनाच्या शिक्षणविषयक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी अधिक गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक कार्य करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार गांगुर्डे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध विभागांना कामातील अडचणी मांडण्याची संधी देण्यात आली. त्यावर आयुक्तांनी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन देत, नागरिकांना कोणत्याही शासकीय सेवेसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील व उत्तरदायी पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले.
यावल तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून, आगामी काळात प्रलंबित कामे, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणावर प्रशासन किती प्रभावीपणे काम करते, याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

