
यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील साकळी येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र निलेश सुधाकर बडगुजर यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे देशसेवा बजावून दि. ३१ जुलै २०२६ रोजी हवालदार मेजर या मानाच्या पदावरून आपल्या सेवास्थळी सन्मानपूर्वक पुर्ण सेवानिवृत्ती झाली . त्यांच्या या गौरवशाली सेवेमुळे साकळी गावासह संपूर्ण यावल तालुक्याचा अभिमान वाढला आहे. दि. ११ जून २००२ रोजी गोवा येथे ३ MTR मध्ये भारतीय सैन्याच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान , कारगिल (जम्मू-काश्मीर), हरियाणा, नवी दिल्ली, नागालँड आदी विविध राज्यांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये कर्तव्य बजावत त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत अखंडपणे जपले.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी ४ COSR (आसाम), MCTE महू (मध्य प्रदेश), ८ mountain Division Signal Regiment (कारगिल), २ COSR (हरियाणा), ६१८ I(I) Brigade Signal Company (आसाम), २१ Signal Group (नवी दिल्ली), १ EW Brigade Signal Company (जम्मू-काश्मीर), ३६ Rapid Signal Regiment (मध्य प्रदेश) तसेच ३ COSR (नागालँड) येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. आपल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि नेतृत्वगुणांच्या बळावर त्यांनी कंपनी हवालदार मेजर या प्रतिष्ठेच्या पदापर्यंत मजल मारली.
श्री. निलेश बडगुजर यांनी देशसेवेसाठी आयुष्यातील २४ वर्षे समर्पित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी साकळी येथे आल्यानंतर त्यांचा साकळी गावात तसेच यावल शहरात जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्यात गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून त्यांचा सन्मान करणार आहेत. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
शेतकरी कुटुंबातील एका युवकाने भारतीय सैन्य दलात प्रामाणिकपणे २४ वर्षे सेवा बजावून गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याने साकळी गावात आनंदाचे वातावरण असून, त्यांचा जीवनप्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

