
यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील मनवेल व थोरगव्हाण परीसरात २४ जून रोजी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली यात केळी पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे .. थोरगव्हाण येथील शेतकरी गजानन गोकुळ चौधरी यांच्या गट नंबर १७२ या मनवेल शिवारातील शेतात दोन हजार केळीचे झाडे लावली होती यात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले यात केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मनवेल तलाठी यांनी शेतात जाऊन पंचनामे केले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे
या पडलेल्या केळीला असलेले घड विक्रीयोग्य तयार नसल्याने ते पूर्ण फेकावे लागणार आहे त्यातच केळीची वजनदार पाने असलेल्या केळीखांबांना फेकण्यासाठी त्या खांबांचे तीन तुकडे करून फेकणे, पाने काढून फेकणे, ठिंबक ठिंबक संच, पाईप काढणे, व नवीन पीक लावणे यासाठी हेक्टरी ६० ते ७५ हजार रुपये खर्च येणार असून आता ही रक्कम कुठून आणायची? हा प्रश्न नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. शिवाय मजुरांचा तुटवडा असल्याने मजूरी ही चढ्या भावाने लागणार आहे. यामुळे केळी उत्पादकांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे केळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

